ई लर्निंग शिक्षण झाले सोपे
शिक्षकी पेशा हा एकमेवाद्वीतीय असा पेशा आहे कारण तुम्ही यात अनेक आव्हाने स्वीकारून अनेक पिढ्या पर्यायाने देश घडवण्याचे कार्य करत असता. तुम्ही जरी शिक्षक असला तरी तुम्ही डाॅक्टर्स, इन्जीनिअर्स, वकील, जज,वैज्ञानिक, नेते, अभिनेते, व्यापारी, उद्योजक असे एकना अनेक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य तुमच्या हातून घडत असते. हे जरी खरे असले तरी यात अनेक आव्हाने आणि अडचणी असतात, परंतु योग्य ती खबरदारी घेतली आणि सुसंगत शैक्षणिक साधनांचा वापर योग्य त्या वेळी केला तर नक्कीच अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया सुकर होते.मोबाइल अॅपच्या वापरामुळे शिशुवर्गातील मुले साक्षरता कौशल्ये लवकर शिकतात व शाळेत जाण्यासाठीची त्यांची पूर्वतयारी शिशुवर्गात अॅप वापरल्याने चांगली होते असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
न्यूयॉर्क विद्यापीठाच्या बालपण व साक्षरता शिक्षण या विभागाच्या प्राध्यापक सुसान न्यूमन यांनी सांगितले की, मोबाइल अॅप्सच्या मार्गदर्शनाखाली वापर केला, तर ते मुलांना एखादी कृती करण्यास उद्युक्त करतात. प्रेरणात्मक हेतूने तयार केलेले अॅप्स मुलांना खरोखर शिक्षणास प्रवृत्त करू शकतात.त्यामुळे आपण अध्ययन अध्यापन प्रक्रियेत एक शैक्षणिक साधन म्हणून ई-लर्निंग व इतर शैक्षणिक अॅपचा वापर कसा करता येईल व ती अॅप या बद्दल माहिती करून घेऊ.
ई क्लासरुम-
हल्ली शाळांमध्ये प्रोजेक्टरद्वारा शिकवलं जातं. शाळेमध्ये ई-लर्निंगचा किमान एक वर्ग असतोच. वर्गातच मोठा स्क्रीन असतो. त्यावर गाणी, गोष्टी दाखवता येतात. यामध्ये बालभारतीतले धडे-कविता-गणित-परिसर-विज्ञान-इतिहास या सर्वाशी संबंधित चित्रं, आकृत्या, व्हिडीओज् दाखवू शकतात किंवा शिक्षकाच्या मोबाइलवर असलेला एखादा व्हिडीओ, भाषणं असं काहीही मुलांना दाखवायचं असल्यास ते सहजरीतीने साध्य होतं. मुलांना वेगवेगळे प्रयोग प्रत्यक्ष बघता येतात. एखादी ताजी बातमीदेखील इंटरनेट जोडणीमुळे मुलांपर्यंत पोहोचवता येते. मुलांना हे स्क्रीन-शिक्षण अतिशय आवडतं हे तर प्रत्यक्षच दिसतं आहे.
सरकारी धोरणंही ई-लर्निंगला अनुकूल आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या डोक्यावरील भार काही अंशी उतरतो. ज्ञानरचनावादात शिक्षकानं मदतनीसाच्या भूमिकेत जायचं आहे, त्यासाठी हे पूरक आहे.
शिक्षक शिकवतात म्हणजे हातात पुस्तक घेऊन बोलतात, मुलं ऐकतात. ते फळ्यावर लिहून देतात, मुलं लिहून घेतात. ते प्रश्न विचारतात, मुलं उत्तरं देतात. ज्या मुलांचं लक्ष आहे, त्यांना समजतं आहे. ज्या मुलांचं लक्ष नाही, विषयाचा कंटाळा आलेला आहे त्यांना काही समजत नाही, असं सर्वसाधारणपणे दिसतं.
जेव्हा अशा पद्धतीनं घडामोडी चालू असतात, तेव्हा मेंदूत प्राधान्यानं डाव्या गोलार्धात काम सुरू असतं. कारण डाव्या भागात भाषेचं केंद्र आहे. ऐकणं, बोलणं, आकलन, ठरावीक शब्दांत, ठरावीक पद्धतीने उत्तर देणं, लिहून घेणं, विश्लेषण ही डाव्या गोलार्धाची कामं. अशा वेळी उजव्या गोलार्धातल्या क्षेत्रांना उद्दीपन मिळेलच असं नाही.
आता हाच पाठ ई-लर्निंग क्लासरूममध्ये चालू असेल तर मेंदूच्या केवळ डाव्याच नाही तर उजव्या भागातही उद्दीपन चालू होईल. मेंदूचा जास्तीत जास्त भाग वापरला जाईल. कारण उजव्या भागामध्ये रंग, चित्र, कल्पना, अभिनय, संगीत, भावना याचं काम चालतं. त्यामुळे मुलांचं लक्ष जास्त प्रमाणात स्क्रीनकडे जाईल, आकलन होईल. मात्र, स्क्रीनशिक्षणाचा मर्यादित वापर केला तर योग्य आहे. कारण स्वत:च्या हाताने प्रयोग करणं, चित्र-आकृत्या काढणं याला पर्याय नाही.
यु ट्यूब
आजकाल यु ट्यूब या सोशल मिडीया द्वारे शिक्षक आणि विद्यार्थी अनेक शैक्षणिक व्हीडीओ च्या सहाय्याने शिकत शिकत आणि शिकवत आहेत. हे अॅप आजकाल प्रत्येक अॅनराॅइड आणि आय ओ एस मोबाइल मध्ये उपलब्ध आहे. फक्त विद्यार्थ्यांनी याचा वापर करताना पालक व शिक्षकांनी त्यांच्यावर लक्ष देने आवश्यक आहे नसता विद्यार्थी त्याचा चूकीचा वापर करू शकतात.
- ग्राफिंग कॅलक्युलेटर – सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कॅलक्युलेटर्सपेक्षा अधिक सुविधा असलेले हे कॅलक्युलेटर आपल्याला साध्या हिशोबांबरोबरच वैज्ञानिक गणित सोडविण्यासाठीही उपयुक्त ठरते. या अॅपमधील कॅलक्युलेटरमध्ये वर्गमुळे, घन, नॅचरल लॉग, एनटीएच रूट, लॉग बेस १०, मूळ संख्या, पर्मिटेशन्स, कॉम्बिनेशन्स, मॉडय़ुल्स, बेल कव्र्ह आदी गणिती प्रकार सोडविण्याचे पर्याय देण्यात आले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना गणित सोप्या पद्धतीने समजवून घेणे आणि सोडविणे शक्य होणार आहे. यामध्ये आपल्याला विविध सांख्यिकीय आलेखही मांडता येतात. याशिवाय या अॅपमध्ये एरिया, अंतर, एनर्जी, शक्ती, मास, दाब, वेग, तापमान, वेळ आदी मापकांचे कन्व्र्हटरही देण्यात आले आहेत.
गुगल ब्राऊझर-
गुगल ला आजकाल गुगल गुरू म्हणून मान लाभला आहे कारण गुगलच्या सहाय्याने प्रत्येक जण कोणत्याही प्रश्नाचे तात्काळ उत्तर शोधू शकतो तेही अगदी सहज आणि आपल्या मातृभाषेत. त्यासाठी फक्त स्मार्टफोन आणि ईन्टरनेट जोडणी असणे आवश्यक आहे. गुगल वर विकीपीडिया या वेबसाईटवर तुम्हाला जगातील ज्ञान एका क्लिकवर उपलब्ध आहे.
इंटरॅक्टिव्ह विज्ञान संग्रह –
जीवशास्त्राशी संबंधित १००हून अधिक संज्ञा आणि संकल्पना या अॅपमध्ये आपल्याला देण्यात आल्या आहेत. यातील काही संकल्पनांचे छानसे व्हिडीओजही देण्यात आले आहेत. यातील बरीचशी माहिती आपल्याला फ्लॅशच्या मदतीने सांगण्यात आली आहे. यात मानवी शरीर, वातावरण, पेशी असे विविध विभाग करण्यात आले आहेत. हे अॅप माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकणार आहे. यामध्ये प्रश्नावलीही आहे. हे अॅप वापरण्यासाठी आपल्याकडे थ्रीजी किंवा वाय-फायची जोडणी आवश्यक आहे. यातील शब्द शोधण्यासाठी सर्चचा पर्यायही यात देण्यात आला आहे.
नासा –
नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेने अंतराळातील विविध विषयांची माहिती देणारे अॅप तयार केले आहे. यामध्ये छायाचित्रे, व्हिडीओज, माहिती, बातम्या, लेख, ट्विट, नासा टीव्ही अशा विविध गोष्टी आपल्याला देण्यात आल्या आहेत. यामध्ये नासाच्या विविध मोहिमांचे अपडेट्स आपल्याला सातत्याने येत असतात. अॅपमध्ये १२ हजारांहून अधिक छायाचित्रे देण्यात आली आहे. विविध विषयांचे व्हिडीओज असून ते आपल्याला मागणीनुसार उपलब्ध करून दिले जातात. नासाच्या विविध मोहिमांच्या वेळी नासा टीव्ही माध्यमातून आपण त्याचे थेट प्रक्षेपणही पाहू शकतो.
वर दिलेली व अशी अनेक अॅप व ई- लर्निंगच्या च्या मदतीने आजचे शिक्षण सुकर होणार यात शंका नाही फक्त गरज आहे योग्य वेळी योग्य त्या शैक्षणिक ई साहित्य वापरण्याची..
महानवर नितीन कोंडिबा
(माध्यमिक शिक्षक )
शासकीय आश्रम वडनेर ता कन्नड जि औरंगाबाद
9422646127
ई मेल nitin12458@gmail.com

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा